प्रिय आजोबा....

प्रिय आजोबा, 

मीच आहे, तुमची आसू. खूप आठवण येत आहे तुमची आजोबा. तुमचा आवाज, तुमच हसू, तुमचा चेहरा सगळ काही राहून राहून मनात घर करून बसल आहे गेले काही दिवस. 


आम्ही सगळे ठीक. आई सांगत होती तुमच्या शेवटच्या क्षणी तुमच्या खिशात दोनच पेपर होते - एक म्हणजे बँकेचा कोरा चेक आणि दुसरा, मामाचा biodata. अगदी शेवट पर्यन्त तुम्ही ज्याच्या काळजीमध्ये होता ते एक काम पूर्ण झाल बर का.. मामाच लग्न झाल, मामी छान आहे, सगळा कार्यक्रम नीटच संपन्न झाला पण तरीही खूप काही चुकल्या चुकल्या सारखं वाटत होत. म्हणजे तुम्ही असता ना तर तुमच्या मागे लागून, 'खूप महाग कपडे घेणार आहे आम्ही' अस उगीचच सांगुन तुमच्याकडे पैसे मागण्यात, तुम्हाला त्रास देण्यात, तुम्हाला चिडवण्यात जी मजा आली असती, ती नाही आली. लग्नात तुमच्या चेहर्‍यावर जो आनंद, जी प्रसन्नता पाहायची होती, ती सुद्धा नाही जमल पाहायला.


बर ते असो.. मी छान आहे, म्हणजे कधी कधी झोपेत असताना तुम्ही भेटायला आलात की रडत रडत माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि मग पूर्ण दिवस हा विचार करण्यात जातो की तुम्ही असता तर कदाचित मी तुमच्याशी काही गोष्टी बोलू शकले असते का? नक्की त्या गोष्टी काय आहेत ते माहिती नाही, पण तुमचा आवाज आणि प्रेमाने म्हणलेल 'आसू' ऐकायच आहे, अस खूप वाटत आहे. 


ओमचे दहावीचे पेपर सुरू होणार आहेत, बोर्डाचे पेपर. तुमचा एक सुद्धा कॉल आला नाही. त्याची तयारी झाली आहे का, तो अभ्यास करत आहे की नाही हे विचारायच कोणी? अथर्व आता इतका उंच झाला आहे की मला सुद्धा मान वर करून पाहाव लागत. तुमची वैष्णो मजेत, मामी मामा सोबत सगळे देव फिरून आली बर का ती!! वेदांश मोठा झाला आहे, खूप, खूप गोड दिसतो तो. तुम्ही त्याला उचलून घेतलेल सोडलच नसत. तुमची क्रांती, आमची टींगी, तीच रडायच पण कमी झालय, हुशार झाली ती आता खूप. 

आता सांगायच झाल तर.. प्रचिती पण खूप हुशार आहे आजोबा, म्हणजे तूरु तूरु बोलते सगळ. 


आई, साधना मावशी, करुणा मावशी खूप रडले मामाच्या अक्षता पडल्यावर. मामाने लगेच देवाला नमस्कार करून वर तुमच्याकडे हाथ जोडले, तुम्ही पाहीलच असाव म्हणा. पप्पांच्या डोळ्यात पण टच करून पाणी आल होत अक्षता झाल्यावर. अजून सुद्धा खूप आठवण काढतात पप्पा तुमची. आजी एकटी सगळे आहेर करून घेत होती आणि तिच्या बाजूची एक खुर्ची रिकामी होती. 'गुंजे गुरुजी असते तर त्यांनी पण पाहील असत लेकाच लग्न' हे सगळ्यांच्या तोंडी होत, खूप उचक्या लागल्या असाव्यात तुम्हाला, हो ना? 


तुम्ही हवे होते आजोबा, खरच तुम्ही असायला पाहिजे होते. तुमची कमी आणि तुमची जागा कधीच भरून निघणार नाही. खूप आठवण येत आहे तुमची, खूप. 

-तुमची आसू. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Twisted promises.

एक पत्र

रेगिस्तान