भास की तुम्हीच?
प्रिय आजोबा, कसे आहात? आम्ही सगळे छान. पुन्हा त्रास देत आहे पण कारणच तस आहे. परवा सकाळी सकाळी मी सायकल चालवत चालवत एक नवीन जागी गेले होते. हो, जरा सायकल चालवणं आणि व्यायाम चालू केला आहे आणि मला माहिती आहे तुम्ही हे ऐकून 'वाह वाह वाह, छान. व्यायाम करायलाच हवा माणसाने. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे' असच म्हणणार मला. मुद्दा तो नव्हे, खर तर जाता जाता एक छोट मंदिर वाटेत लागल. सकाळी ६:३० ची वेळ असावी बहुतेक आणि तिथे काही जण टाळ वाजवत 'पांडुरंग हरी, पांडुरंग हरी' म्हणत होते. ते पूर्ण वातावरण अचानक त्या आवाजाने अगदी वेगळ झाल होत म्हणुन किंवा ती सगळी मंडळी शुभ्र पांढर्या कपड्यात होती म्हणुन किंवा तुम्ही नेहमी 'पांडुरंग हरी' म्हणत होते म्हणुन की काय माहिती नाही पण अचानक मला तुमची तीव्र आठवण आली. पुढे गेल्यावर आसपासचा परिसर पण तसाच होता, पूर्ण गावासारखा. एका ठिकाणी चूल पेटली होती, एका ठिकाणी एक लहान मुलगा आंघोळीसाठी असाच उघडा इकडे तिकडे पळत होता, चुलीवर गरम पाणी करताना धूर झाला होता आणि दगड - खड्डे असलेला कच्चा रस्ता. सगळेच अगदी तुमचा भास करून देत होते. पुढे गेल्यावर मल...