भास की तुम्हीच?
प्रिय आजोबा,
कसे आहात? आम्ही सगळे छान.
पुन्हा त्रास देत आहे पण कारणच तस आहे. परवा सकाळी सकाळी मी सायकल चालवत चालवत एक नवीन जागी गेले होते. हो, जरा सायकल चालवणं आणि व्यायाम चालू केला आहे आणि मला माहिती आहे तुम्ही हे ऐकून 'वाह वाह वाह, छान. व्यायाम करायलाच हवा माणसाने. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे' असच म्हणणार मला. मुद्दा तो नव्हे, खर तर जाता जाता एक छोट मंदिर वाटेत लागल. सकाळी ६:३० ची वेळ असावी बहुतेक आणि तिथे काही जण टाळ वाजवत 'पांडुरंग हरी, पांडुरंग हरी' म्हणत होते. ते पूर्ण वातावरण अचानक त्या आवाजाने अगदी वेगळ झाल होत म्हणुन किंवा ती सगळी मंडळी शुभ्र पांढर्या कपड्यात होती म्हणुन किंवा तुम्ही नेहमी 'पांडुरंग हरी' म्हणत होते म्हणुन की काय माहिती नाही पण अचानक मला तुमची तीव्र आठवण आली. पुढे गेल्यावर आसपासचा परिसर पण तसाच होता, पूर्ण गावासारखा. एका ठिकाणी चूल पेटली होती, एका ठिकाणी एक लहान मुलगा आंघोळीसाठी असाच उघडा इकडे तिकडे पळत होता, चुलीवर गरम पाणी करताना धूर झाला होता आणि दगड - खड्डे असलेला कच्चा रस्ता. सगळेच अगदी तुमचा भास करून देत होते.
पुढे गेल्यावर मला वाटल की मी अजून २ मिनीट तिथे थांबायला पाहिजे होत, बहुदा त्यांच भजन वैगेरे झाल आणि ते सगळे बाहेर आल्यावर तुम्ही सुद्धा त्यात असाल तर? आणि फक्त मी पुढे निघून आले म्हणुन मला तुम्हाला भेटायच राहून गेल अस झाल असेल तर? तो विचारच जात नाहिये डोक्यातून. खरच होता का तुम्ही आजोबा तिथे? भेटता आल असत का आपल्याला? आईला हे सांगितल नाही मी, ती मला वेडी म्हणाली असती पण खरतर मला तो भास शब्दात मांडताच आला नसता. वेळ जातो तस आपण पुढे जगायला शिकतो आणि मागचे मागे राहून जातात अस म्हणतात, पण काळामागे राहणार्यापैकी तुम्ही कधीच नव्हता. म्हणुन प्रत्येक वेळी मला तुमची आठवण येते किंवा तुमचा भास होतो बहुतेक.
तुम्ही परत या किंवा कधी येणार आहे हे नाही विचारणार. कारण माझा वाढदिवस झाला, तुमच्या वैष्णुचा पण झाला तरीही साधी एक झलक सुद्धा नाही तुमची. तरीही मी थांबले होते कारण नेहमी तुम्ही वाढदिवस विसरायचे आणि आजी तुम्हाला आठवण करून द्यायची. पण ओमचा पण वाढदिवस झाला, त्याच तर नाव खूप उत्साहाने ठेवल होत ना तुम्ही? 'उत्कर्ष'. तरीही काहीच नाही, साधी एक झलक सुद्धा नाही. कळून चुकल आहे की आता नाही येणार तुम्ही. खर सांगा आजोबा, तुम्ही विसरला आहात ना आम्हाला?
असो, जयक्रांती ची क्रांती चालूच आहे. वेदांश खूप खूप गोंडस आहे आणि आता त्याच्या मागे चार जणांना पळाव लागत म्हणे, त्याला आवरायला. अथर्व यावर्षी दहावीत बर का. यावर्षी पण बहुतेक अशीच जाईल त्याची दहावी, ऑनलाईन. तुम्ही असता तर खूप नाव ठेवली असती या शिक्षण पद्धतीला. 'छे अस असत का कुठे, मुलांना काही महत्त्वच नाही राहणार परीक्षेच, अभ्यास कस करणार ते' वैगेरे वैगेरे.
आजोबा एक सांगायच होत, सगळे आपापल्या कामात गुंग झाले तरीही आजी मात्र प्रत्येक फोन मध्ये न चुकता तुमचा विषय काढते, नेहमी तुमची आठवण काढते. सगळ्यात जास्त त्रास तिला होतो तुम्ही नाहिये याचा. पोटात कालवल्यासारख होत तिच्या तोंडून तुमच्या आठवणी ऐकल्या की. आई पप्पा पण छान आहेत. थोड टेंशन आहेच त्यांना पण ठीके.
असो, परत लागलच तर पुन्हा त्रास देईनच पण तुम्ही.. काळजी घ्या..
तुमची आसु
Comments
Post a Comment