एक पत्र

प्रिय आजोबा, 

आम्ही सगळे ठीक, म्हणजे आई नेहमी रडत असते आणि आजी एकटी पडलीय पण तरीही आम्ही सगळे ठीक आहोत. पप्पांनी रोज जेवण झाल की तुमच नाव घ्यायचं आणि 'गुंजे गुरुजी ग हेळु आदु थोडे आव आष्टु खळस कुडु आणव' किंवा जेवताना पाणी दिल नाही तर हसत हसत 'गुंजे गुरुजी कलसीला येणु' अस म्हणायच पण बंद केलय, पण तरीही आम्ही सगळे ठीक आहोत. दसरा येत आहे आणि तुम्ही कॉल करुन (पप्पांना कॉल, आम्हाला किंवा तुमच्या स्वतःच्या मुलीला नव्हे) आम्हाला शुभेच्छा देणार नाही किंवा प्रत्येक सणाला तुमचा सकाळी सकाळी न चुकता कॉल येणार नाही ही गोष्ट पचत नाहिये, पण तरीही.. आम्ही सगळे ठीक आहोत. 

(आमची विठू माऊली! )

 तुम्हाला आठवतय आजोबा, 'छावा' पुस्तकासाठी भांडला होता तुम्ही माझ्याशी. मला फक्त वाचण्यासाठी ते पुस्तक पुण्याला घेऊन यायच होत आणि नंतर मी परत सुद्धा करणार होते पण तुमचा त्या अगदी फाटून चिंध्या झालेल्या पुस्तकासाठी अट्टाहास - 'वाचायचे तर इथेच वाच, मी माझ पुस्तक देणार नाही', ते पाहून मी शॉक झाले होते. तर ते पुस्तक भेटल बर का मला, अगदी तसच आहे ते, फाटून चिंध्या झालेल! तुमचा खजिना सुद्धा पाहिला आम्ही, तुमच्या मोठ मोठ्या पेट्या ज्या मध्ये - आई, मामा आणि तिन्ही मावशींचे फोटो, त्यांच्या वह्या, सर्टिफिकेट, अगदी लग्नाच्या पत्रिका सुद्धा आणि इतकच नव्हे तर तुमच्या सगळ्या नातवंडाची जन्मपत्रिका, तुमच्या काही आठवणी, तुम्ही फिरायला गेलेले तुमचे फोटो (अगदी विठोबा दिसत आहात) सगळ पाहिल आम्ही. तुम्ही होता तेव्हा त्या पेट्यांकडे नजर टाकायची पण हिंमत नव्हती कोणाची. 

      
(तुमचा खजिना!) 

हे पाहून तर थक्क झाल मला, सगळ्या आठवणी, प्रसंग जपलं आहे तुम्ही! बहुतेक लिखाणाची, वाचनाची आणि नाटकी करायची कला माझ्यामध्ये कळत नकळत तुमच्या कडून आली असावी का?






(तुमची डायरी!) 


अहो आजोबा, आईचा जन्म १ नोव्हेंबर नाही, २ ला झाला आहे अस कळल तुमच्या डायरी मधून. म्हणजे धक्काच बसला मला ते पाहून आणि पप्पा म्हणत आहेत की कुंडलीच चुकीची जुळवली मग आमची गुरुजींनी. हो, तुमच्या सगळ्या डायरी पण पाहिल्या मी, तुम्ही किती काटेकोर होता ते कळल मला. तुम्ही नाटकात काम करायचा, गोष्टी आणि लेख लिहायचा ही गोष्ट जर मला आधीच कळली असती तर रोज रात्री फक्त पाढे शिकण्याऐवजी मी हे सगळ पण शिकले असते. तुम्ही गोष्टी सांगायचा तेव्हा 'कोल्हेकुई' शब्द फार आवडला होता मला, म्हणजे गोष्ट नीट आठवत नाहिये पण शब्द अजून सुद्धा तुमची आठवण करून देतो, नेहमी. तुमच्या सगळ्या नातवंडापैकी तुमच्या सोबत, तुमच्या वर्गात बसुन तुमच शिकवलेल पाहणारी मी एकटीच आहे आणि मुलांमधे तुमच्या बद्दल आदर, भीती, प्रेम सगळच अगदी भरभरून पाहिलय मी, आणि त्यामुळेच पूर्ण गावात 'गुंजे गुरुजींच्या नाती' म्हणुन जेव्हा कोणी ओळखत होत तेव्हा इतका अभिमान वाटायचा तुमचा, अजून सुद्धा वाटतो. 

आई सांगत होती खंडाळा मध्ये तुम्ही मुख्याध्यापक होता आणि तिथे असताना 2 वेळा तुमची बदली गावा मधल्या लोकांनी थांबवली होती. इतक प्रेम करायचे सगळे तुमच्यावर! इथे पुण्याला आल्यावर सुद्धा तुम्ही शक्य तितक्या सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटायला जात होता, सगळ्यांशी प्रेमाने बोलून, त्यांना स्वतःची भुरळ घातली होती तुम्ही! इतका मान, इतका औदा, इतक सगळ असून सुद्धा गर्वाची एक साधी लकीर ही कधीच नव्हती तुमच्या चेहर्यावर. (पण मला खूप गर्व आहे बर, तुमची नात आहे याचा). तुम्ही आयुष्यभर माणस जोडली, नाती जपली, कर्तव्य न चुकता पार पाडली, सगळ्यांना समुपदेश आणि योग्य तो मार्ग दाखवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची तत्त्व शेवट पर्यंत सोडली नाहीत. आजकालच्या जमान्यात अगदी पावला पावलावर खोट बोलणारी, वागणारी माणस आहेत आणि त्या सगळ्या मध्ये तुम्ही एका क्षणाला सुद्धा लबाडपणा स्विकारला नाही, करायची गोष्ट तर लांबच. नक्की काय आणि कसे घडला होता हो आजोबा तुम्ही? काय चालायच तुमच्या मनात? कस काय जमायच तुम्हाला इतक पारदर्शक राहण? इतिहास, आपली संस्कृती जपायची आणि पुढच्या पिढीसाठी स्वतःला बदलत राहण यात सुद्धा मागे राहिला नाहीत तुम्ही. खरच नवल वाटायच मला खूप! आज कितीही काहीही कष्ट केले तरीही तुमच्या सारखा माणूस पुन्हा होणे नाही.

(Degree आणि तुम्ही!)

तुम्ही नाही ही कल्पनाच असह्य आहे हो. म्हणजे सलगर ला गेल की अगदी दारात असेपर्यंतच तुमचा 'आलो, या' अस म्हणत म्हणत हातातला पेपर नीट फोल्ड करत आमच्या हातातून बॅग्स घेण्यासाठीची तुमची तयारी नसणार हे समीकरणच अगदी चुकल्या चुकल्या सारख आहे. आता फोन केला की - 'कसे आहात, अभ्यास कसा चालू आहे, काळजी घ्या' हे सांगायला कोणीच नाही याची खंत वाटत आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान हे तुमच्यासाठी किती योग्य आहे माहितीये?! आम्हाला, आईला, सगळ्या मावशींना, मामाला आणि मुख्य म्हणजे आजीला एकट सोडून, पोरकं करून गेला आहात आजोबा. आई म्हणते तस देवा शिवाय गाभारा झालय आमच आजोळ.

एक मागायच होत... जमल तर पुन्हा यायचा प्रयत्न कराल? 

-    तुमची आसू!



Comments

  1. किती छान लेखन करतेस ग तू !!!

    मस्तच.मला खूप खूप आवडला हा लेख.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Twisted promises.

रेगिस्तान